HARISHANDRAGAD हरिश्चन्द्रगड


किल्ले हरिश्चन्द्रगड हा एक सह्याद्रीतील अनंत दुर्गवैभवांपैकी एक. अहमदनगर जिल्ह्याला भूगोलाचे वरदान आहे. कळसुबाई शिखर, सांदण दरी, रतनगड, भंडारदरा ते माळशेज घाट हा परिसर निसर्गवैभवाने नटलेला आहे. कोणत्याही ऋतूत जा तिथे निसर्गाचा अपूर्व असा अविष्कार दिसल्याखेरीज राहत नाही. तसा सह्याद्री खूप सुंदर आहे परंतु सह्याद्रीचे रौद्रभीषण रूप पाहायचे झाले तर हा परिसर सुंदर निवड ठरतो. खूप दिवसांपासून हरिश्चन्द्रगड पाहायची इच्छा होतीच परंतु ताळमेळ काही बसत नव्हता. नंतर नगर ला असताना डिसेंबर महिन्यात सगळ्यांचे नवर्षाच्या स्वागताचे (मराठीत सांगायचं झालं तर थर्टी फर्स्ट !) बेत ठरायला लागले आणि या योगायोगात मला आठवला तो हरिश्चन्द्रगड. तास पहिलं तर दररोजच्या आरामदायी जीवनशैलीमुळे भटकंती आजकाल खूप कमी होत चालली आहे. आजच्या या व्हाटसअपीकरण, फेसबुकीकरणामुळे निसर्गभ्रमण, सह्यांकन करण्याची आवड असलेली जमात फारच दुर्मिळ होत चालली आहे. मी जायचा विचार मांडला तेव्हा चार पाच जण तयार होते, काही जाणकार मंडळींनी आधीच नकार कळवला होता. शेवटी ३१डिसेंबर २०१६ ला सकाळी  मी आणि आकाश असं दोघांनी दिल्लीगेट वरून प्रस्थान केले. हिवाळा चांगलाच जोमात असल्याने १० वाजले तरी गारवा खूपच होता. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार शेते  असल्याने थंडीचा कडाका होता. तेवढ्यात रस्त्याच्या बाजूला छोटेखानी हॉटेल दिसले आणि आम्ही गरमागरम चहावर ताव मारला. 
रस्त्यालगत असणाऱ्या टपरीवर चहा 
मजल दरमजल करत नेप्ती, आळेफाटा, ओतूर मार्गे आम्ही माळशेज घाटाच्या तोंडाशी असलेल्या खुबी फाट्यापाशी आलो. खुबी फाट्यापासून दिसणारे सह्याद्रीचे ते विहंगम दृश्य एकीकडे माळशेज घाट अन दऱ्या तर दुसरीकडे पिंपळगाव जोग धरण. 
पिंपळगाव जोग धरण 

पिंपळगाव जोग धरण 
धरणाच्या बांधावरूनच खिरेश्वरला जाणारी वाट आहे. त्या वाटेवरूनच आम्ही हळूहळू निघालो कारण खूप खड्डे आणि धूळ असा एकंदरीत २ ते २.५ किमी चा प्रवास पावसाळ्याचा भूतकाळ सांगत होता. सोबत पायी जाणारे आणि बरेच  वाहने सुद्धा होती. खिरेश्वर मध्ये पोचताच आम्ही एका ठिकाणी गाडी पार्किंग करून गडाची वाट विचारली आणि मार्गस्थ झालो. आता घनदाट झाडी लागत होती आणि अधूनमधून सरळसोट कडे दिसू लागले. त्यांच्या आश्रयाने असलेली मधमाश्यांची प्रचंड घरटी दिसू लागली 


जसजसे आम्ही जवळ जाऊ लागलो तसतशी वाट बिकट होऊ लागली. बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी वाहून वाट झिजली होती आणि अरुंद घळीसारखी दिसत होती अन त्यात चढाव त्यामुळे आकाशला जमीन दिसू लागली! 


अरुंद घळीसारखी वाट


थकलेला आकाश
समोर दिसणारे अजस्र कडे आणि बिकट होत जाणारी वाट पाहून आकाशने एक हिताचा निर्णय घेतला. म्हणजे अगदी "सिदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति" अशी परिस्थिती. मग काही खाण्यापिण्याचे सामान घेऊन आकाशने खिरेश्वर गावात मी वापस येईपर्यंत  थांबण्याचा निर्णय घेतला आणि मी गड करून सूर्यास्तापर्यंत वापस येण्याचे ठरवून "करिष्ये वचनं तव:" च्या आविर्भावात निघालो. थोडी वाट चढल्यावर एक गावातील मुलगा लिंबूपाणी घेऊन बसला होता; त्याच्याकडून लिंबूपाणी घेऊन मी एक आधारासाठी त्याच्याकडून एक काठी तोडून घेतली आणि चालू लागलो. खरंतर आता हि काठीच माझा आधार होती. वाट खूपच गर्द झाडांतून जात कठीण होत होती, त्या निरभ्र शांततेत अधूनमधून पक्ष्यांचे गुंजारव कानी येत होते. ज्या टोलारखिंडीत पोचल्यावर माझा खरा गडाचा रस्ता सुरु होणार होता ती टोलारखिंडच  काही केल्या येईना. त्या निबिड अरण्यात चालून मीही जरा घाबरलेलोच होतो पण शिवप्रभूंचे स्मरण करत भवानी स्तोत्र म्हणत मी वाट कापू लागलो. उतरणारे एक दोघे भेटले तेव्हा खिंड २० मिनिटाच्या अंतरावर असल्याचे कळले. क्षणभर मला आपण फार मोठा पराक्रम करत असल्याचे जाणवले. थोडं समोर आल्यावर मला एक ६०च्या आसपास असलेले आजोबा भेटले, विचारपूस केल्यावर कळले कि ते डोंगराच्या पलीकडील पायथ्याला असणाऱ्या टाकळी ओतूर वरून खिरेश्वरला जाण्यास हाच रस्ता वापरतात. तेव्हा विचार आला हम किस पेड़ की पत्ती?
टोलारखिंडीत
हा हा म्हणता मी टोलारखिंडीत पोचलो. तिथे स्थानिक गावकरी  वडापाव, काकडी विकत होते. खिंडीमध्ये जमिनीवर एक ताडपत्री अंथरलेली होती, मी काकडी मीठमिरची लावून खातखात बॅग उशाला घेत ताणून दिलं.
टोलारखिंडीचे दिसणारे दृश्य 
पुन्हा सुरु झाली चढाई. दोन अवघड खडकाळ चढणी (ROCK PATCH) पार करून वरती आलो. तोलारखिंडीचे ते विस्मयकारक दृश्य, आजूबाजूच्या डोंगरांचे कातळ दिसू लागले. नागमोडी वळणे घेत वाट टप्प्या टप्प्याने डोंगराच्या तुटलेल्या कड्यावरून चढत होती. एका बाजूला उंच कडा आणि दुसरीकडे खोल दरी.
तुटलेल्या रेलिंग आणि उभी चढण
थोडे वर चढून आल्यावर एक स्फटिका सारखा तुटलेला खडक लागतो त्यातून जाणारी वाट पुरती दमछाक करणारी आहे. अरुंद अशी खडकाचे चौकोनी काप असलेली चढण पार केली आणि जवळच छोटेखानी नैसर्गिक गुहा तयार झाली आहे तेथे विसावलो. तेवढ्यात दोन चार जण खालून येऊन विसावले. चर्चेअंती तेही औरंगाबादकर अस्लासल्याचे जाणवले आणि माझाही आनंद द्विगुणित झाला तो याचसाठी की बऱ्याचदा सह्याद्रीत फिरायला गेलो की बहुतेक मंडळी ही पुण्या-मुंबईची असतात. बरेच अंतर असल्याने आणि पठारी भागाची सवय असल्याने औरंगाबादकरांचा सह्याद्रीकडचा ओढा तसा आटलेलाच असतो.
मजल दरमजल करत मी वर पोचलो. 
वरून दिसणारा आसमंत 
बेलाग कडे आणि दऱ्या 
येथून दोन वाटा फुटतात एक वाट चढउताराची तर दुसरी सरळ वाटणारी बालेकिल्ल्याच्या जवळून जाणारी; जास्त माहिती नसल्याने मी सरळ आणि बालेकिल्ल्याकडून जाणारी वाट धरली. पायवाट खूप अरुंद आणि झाडाझुडपांनी वेढलेली होती. भोवताली किर्रर्र शांतता आणि बालेकिल्ल्याची सावली पडल्याने अंधारून आल्यासारखे वाटत होते. काही ठिकाणी झाडे ओरबाडून काढत होती. मध्ये एक जत्था भेटला त्यांना विचारले तर कोकणकडा अजून किमान २ किमी असल्याचे सांगितले. मी घड्याळात बघितले तर ३. १५ वाजले होते अन योगायोगाने पायथ्यापासून गायब झालेलं मोबाईलचं नेटवर्क पण आलं होतं. मी परिस्थितीचा अंदाज घेतला (पर्यायाने आवसानाचा) आणि वापस संध्याकाळपर्यंत जाणं शक्य नसल्याचा कौल मनानं दिला. वेळ न दवडता (कारण मोबाईलची बॅटरी वेगाने उतरत होती) मी आकाशला घराकडे जाण्याची वार्ता कळवली अन मार्गक्रमण सुरु केले ते उघड्या आभाळाखाली रात्र काढायची याची मानसिक तयारी करूनच. आता नेटवर्क तर गेलंच होतं आता पटपट वाट कापायची होती. आता फक्त मी आणि मीच होतो. निसर्गनिरीक्षण करत, ऊर्जांपेय घेत घेत मी चालू लागलो.  बरीच पायपीट केल्यानंतर दुरून हरिश्चन्द्रेश्वराच्या मंदिरावरचा ध्वज दिसू लागला. थोड्याच वेळात मी दोनचार टेकड्या पार करून मी त्या दरीजवळ पोचलो. तेथून तारामती शिखराच्या पोटात असणाऱ्या गुहा, जवळील पुष्करिणी, हरिश्चन्द्रेश्वराचे पुरातन मंदिर, बाजूलाच असणाऱ्या गुहा, चांगदेव ऋषींची तपश्चर्येची जागा, त्याखालील भूमिगत पाण्याची कुंडे हा अगदी नयनरम्य परिसर दिसतो.
हरिश्चन्द्रेश्वराच्या मंदिराचे शिखर 
मंदिराच्या डाव्या बाजूला गणपतीची सुरेख मुर्ती आहे. थोडे खाली उतरून गेले की एक गुहा लागते तेथे मध्यभागी शिवलिंग असून ते जवळपास कमरेइतक्या पाण्याने वेढलेले आहे.येथून खाली मळगंगा नदी वाहत जाते.
जलमग्न शिवलिंग 
नंतर मी माझा मोर्चा वळवला तो खास आकर्षण असलेल्या कोकणकड्याकडे. हे सह्याद्रीचे एक अनुपम, अद्भुत असे दृश्य आहे. जवळपास दीड किमी पेक्ष्या जास्त लांबीचा आणि सहाशे फुटांपेक्षा जास्त उंची असलेला अजस्र कडा हे हरिश्चन्द्रगडाचे खास आकर्षण. हा कडा इतर कड्यांपेक्षा सरळसोट नसून अंतर्वक्र आणि एकंदरीत आकार हा इंग्रजी C सारखा आहे. संपूर्ण कांद्याचा अंदाज घ्यायचा असेल तर कड्याच्या मध्यभागी एक खोबण आहे तिच्यात उतरून सावधपणे खालून येणाऱ्या वाऱ्याचा सामना करत त्याची भीषणता, आणि रौद्रता अनुभवता येते. खालून येणाऱ्या वाऱ्याचा वेग हा प्रचंड असतो. पावसाळ्यात इथे उलटे धबधबे तयार होतात. एरवीही पाण्याची धार ही उलटीच वाहते. काही नाठाळ पर्यटक त्या नादात खाली रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या फेकत असतात.
कोकणकड्याभोवती असणारे रौद्रभीषण कडे 
अंतर्वक्र कड्याचे विहंगम दृश्य 
कोंकणकड्याचे विस्तीर्ण (पॅनारॉमिक) दृश्य 
एव्हाना सायंकाळचे साडेचार वाजले होते. मी कोकणकड्याची जोराच्या वाऱ्याचा सामना करत, त्या विस्तीर्ण कड्याचे विहंगावलोकन करत अर्धप्रदक्षिणा पूर्ण केली. सोबत आणलेली फळे खाल्ली. आता सूर्य मावळतीकडे झुकू लागला होता. आजचा दिवस काही खास होता, बरीच पावले आज २०१६ ला निरोप देण्यास कोकणकड्यावर आली होती, येत होती, काहीजण तंबू लावत होते. मीही कड्याच्या अंगावरून येणारा गार वारा अंगावर घेत भा. रा. तांबे  यांच्या "मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुज जोडून दोन्ही करा" भावनेने मावळते सूर्यबिंब पाहत होतो, सरत्या वर्षाचा हिशेब करत होतो. मना सत्य संकल्प जीवी धरावा.... यासाठी निसर्गाकडे आशाळभूतपणे पाहत होतो. निसर्गाची प्रचंडता, गंभीरता बघितली की आपण किती लहान आहोत हि गोष्ट ध्यानात येते. 
कोकणकड्यावरून दिसणारा सूर्यास्त
गडावर येताना मी जरी एकटा होतो तरी आता मात्र कोकणकडा गजबजू लागला होता. याच ठिकाणी मला मुंबईहून आलेले अनुराग गोसावी आणि मनोज कुंचाराम हे गृहस्थ भेटले. दोघेही नववर्षाच्या स्वागतासाठी मोटारसायकलवर आले होते. येथे आम्ही सर्वजण गप्पागोष्टी करत करत सरत्या वर्षाला निरोप देत होतो. आता अंधार पडू लागला होता. मावळतीला सुंदर अशी लाली आली होती, काही चांदण्या दिसू लागल्या होत्या. कड्याच्या अंगाने सर्वजण घोळक्याने बसले होते, कुणी गात होते, कुणी गिटार वाजवत होते एकंदरीत रम्य असा परिसर झाला होता.
कोकणकड्यावरची रम्य सायंकाळ 
आता चांगलेच अंधारून आले होते. आम्ही टॉर्चच्या उजेडाचा आधार घेत हरिश्चन्द्रेश्वराच्या मंदिराकडे निघालो. तिथे असणाऱ्या झोपडीवजा हॉटेलात आम्ही गरमागरम जेवणावर ताव मारला. आता आठ साडेआठ वाजले होते. एवढ्या उंचावर चांगलीच थंडी जाणवू लागली होती. दोनचार ठिकाणी शेकोट्या पेटल्या होत्या. आम्हीही एका शेकोटीच्या आश्रयाला धावलो. इथे अभिजीत डोळस हे व्यक्तिमत्व मला भेटलं. चर्चेअंती त्यांचा मोठा ग्रुप असल्याचे कळाले. मग आम्ही सर्वांनी  एका ठिकाणी आमचा तळ टाकला मधोमध शेकोटी पेटवली होती. हे सर्व जण नारायणगाव जवळील रांजणी या गावचे खूप मनमिळावू आणि पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली च्या तोडीचे होते. यांमध्ये ज्ञानेश्वर भोर(माऊली), महेंद्र भोर (मामा), प्रतीक भोर, अतुल जाधव, राजेश थोरात, ओंकार बेल्हेकर असे सर्वजण भेटले. गप्पागोष्टी करता करता रात्र उलटत होती. मध्यरात्री १२ च्या ठोक्याला एकाच जल्लोष झाला सर्व तंबूमध्ये लाईट लागले, बऱ्याच जणांनी फटाके फोडले, शांतपहुडलेला हरिश्चन्द्रगड पक्ष्यांच्या किलकिलाटात काही काळापुरता जागा झाला. शेकोटीच्या निखाऱ्याच्या आसपास आम्ही बोचऱ्या थंडीपासून बचाव करत घोळका करून बसलो. काहीजण शेकोटोभोवतीच पेंगुळत होते. पहाटे साडेतीन चारच्या आसपास थंडीचा कडाका खूपच वाढला तसा आमचा लाकूडफाट्याचा साथ संपत आला आणि भल्या पहाटे अंधारात डोक्याला टॉर्च बांधून परत लाकडे गोळा करण्याची वेळ आमच्यावर आली; परत सर्व शिबंदिनिशी आमचं पथक हजार झालं आणि आम्ही शेकोटीची उब घेत, शुक्राच्या चांदनीची वाट पाहत ते शरदाचं चांदणं नयनांतून साठवत होतो. करता करता सकाळ झाली आम्ही सर्व आन्हिकं उरकून तयार झालो. रात्रीच्या शेकोटीच्या अवशेषांवर चूल मांडली, दोघांनी मंदिराजवळील टाक्यांतून पाणी आणलं, कुणी कांदा, लसूण करत करत आम्ही खिचडी शिजवायला टाकली. अजून उरलेला तारामती आणि रोहिदास शिखराचा पल्ला गाठायचा होता. खिचडी खाऊन आम्ही शिखराकडे जाणारी घनदाट झाडींनी व्यापलेली अशी वाट पार करत आमची चढाई सुरु झाली.
तारामती शिखराच्या वाटेवर १३३४ मी 
तारामतीकडे जाताना दोन ठिकाणी खडतर चढाव आहे, आजूबाजूच्या दऱ्या पाहत आम्ही तारामतीवर पोचलो. इथून माळशेज घाटाचे आणि आजूबाजूच्या जलाशयांचे खूप सुंदर दर्शन घडते. पूर्वेच्या पायथ्याने असलेले जंगल पाहताना, माणसाचा हस्तक्षेप नसला की निसर्गाची भरभराट कशी होते याची प्रचिती येते. समोर थोडे खाली असलेले रोहिदास शिखर खुणावत होते. आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळवला. रोहिदास शिखरालागत असलेला परंतु खोल अरुंद दरीने विलग झालेला सुळका सकाळच्या उन्हात उठून दिसत होता. येथून संपूर्ण कोकणकडा नजरेच्या टप्प्यात येतो. खाली कोकणकड्याकडे जाताना एक अवघड कडा पार करावा लागतो. येथे शिडीची व्यवस्था आहे. त्या अर्धवट तुटलेल्या शिडीवरून आम्ही उतरलो. समोर विस्तीर्ण कातळ पसरलेला आहे यावर पावसाळ्यातील वाहणाऱ्या पाण्याच्या पांढऱ्या रेघा  दिसत होत्या. आता आम्ही कड्याच्या दुसऱ्या टोकाशी येऊन पोचलो. धाडसाने एकमेकांना आधार देत आम्ही अगदी काठावरून खालचा प्रदेश बघितला, नळीची वाटही येथून दृष्टीक्षेपात येते. बराच वेळ निवांत घालवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. 

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Forts of maharashtra